शनिवार, २ जानेवारी, २०१०

धनगड अका घनगड आणि नव वर्ष

पहिल तर तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बहुतेक सर्वजण ३१ डिसेंबरची रात्र जागून नव्या वर्षात झोपी गेले असणार पण आमचा प्लान काही वेगळाच होता. वर्षाची सुरवात ट्रेक ने करायची आणि पहिला सूर्य बघायला निसर्गात जायचे. पहाटे ४ ला निघून आम्ही पौड मुळशी ताम्हिणी लेक-४९ करत धनगड (घनगड) सर केला. ह्या आमच्या वेडाबद्दल थोडेसे..

३१ डिसेंबर ची रात्र इतकी काही चांगली गेली नाही पार्टी, डी.जे. जेवण सगळेच बकवास होते. दुपारपासून पंकजच्या मागे लागलो होतो नवीन वर्षाची सुरवात ट्रेक ने करू तसा प्लान बी पण तयार होता. पण रात्री ११ ला त्याचा फोन आला कि धनगड ज्यालाच घनगड असे पण म्हणतात तिकडे जाऊ. त्याने झोपताना एक लिंक पाठवली होती ज्यात गडाबद्दल माहिती होती. तरी १ वाजता त्याने फोन केलाच ४ वाजता जे एम रोड ला भेटू म्हणून. प्रॉब्लेम एकच होता गाडीत पेट्रोल न्हवते. पहाटे ४ ला मी जे एम रोड ला पोहोचलो पंकज निघाला होताच वाटेत त्याला आर टी ओ चा पेट्रोल पंप चालू दिसला मी लगेच तिकडे पोहोचलो चला एक काळजी मिटली होती. त्याची गाडी पार्क करून आम्ही चांदणी चौक च्या दिशेने निघालो. वाटेत अमृतेश्वर चा चहा पिला. सचिन (अपर्चर जंकी) येतोय म्हणून पंकज ने सांगितले मग त्याची वाट बघितली चांदणी चौक ला. त्याला यायला १०-१५ मिनिटे लागले त्याचा पण पेट्रोल प्रॉब्लेम होताच. लकीली जवळच कुठेतरी भेसळयुक्त का होईना पण पेट्रोल मिळाले. बरोबर ५ च्या दरम्यान आम्ही ताम्हिणी च्या दिशेने कूच केली.३० किमी च्या बम्पी राईड नंतर (म्हणजे रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था होती) मुळशी धरणाच्या मागे कुठेतरी आम्ही ब्रेक घेतला पौर्णिमेचा पूर्ण चंद्र मावळतीला निघाला होता त्याचे सुंदर प्रतिबिंब मुळशी च्या पाण्यात पडले होते मागचे डोंगर पण त्यांचे अस्तित्व दाखवत होते. असे दृश्य आणि फोटो नाही काढायचे म्हणजे काय तिघांचे कॅमेरे बाहेरे निघाले पटकन फोटो काढले आणि पुढे निघालो.
धनगड साठी तुम्हाला ताम्हिणी गावानंतर पुढे एका आश्रमासाठी एक उजव्या बाजूला वळण घ्यावे लागते तोच रस्ता पुढे लोणावळ्याला पण जातो. चांदणी चौक पासून ७० किमी अंतरावर असणाऱ्या एकोले गावात पोहोचावे लागते. रस्त्यात नवरा-नवरी डोंगर पण लागतो. म्हणजे ३ सुळके आहेत ज्याला नवरा नवरी आणि मध्ये भटजी अशी नवे आहेत. तिकडून तैल-बैल ची शिखरे पण दिसतात.


साधारण ७ च्या दरम्यान आम्ही एकोले मध्ये पोहोचलो. थंडी तर होतीच सोबत हवा पण चालू होती. गाव (चार पाचच घरे होती) तसे अर्धे कच्चे जागे झाले होते. आम्ही एका घरात हेल्मेट्स ठेऊन गड चढायला चालू केली. १० च मिनटात गाजराईचे मंदिर लागते तिथून पुढे पाचच मिनटात तुम्ही स्टेज १ ला पोहोचता म्हणजे धनगड आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या डोंगर मध्ये एक जागा आहे जिकडून दोन्ही बाजूचे परिसर आणि डोंगर रांगा दिसतात. तिथून तुम्ही धनगड मध्ये प्रवेश करता. प्रवेशालाच दोन गुहा आहेत जिकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते तिकडेच देवीची एक मूर्ती आहे एक मोठी शिळा पण पडली आहे. आता इथून वरती जाण्यासाठी एक वीस फुटाचा रॉक पॅच आहे तसा अवघड नाहीये पण तसा सोप्पा पण नाहीये. पंकज अगोदर वरती गेला आणि तिकडे असणाऱ्या हुकला रोप बांधला. मी सचिन ला वरती चढवायचा पर्यंत केला पण तो म्हणाला मी इकडेच थांबतो मग मी आणि पंकज वरती जायचे ठरले.


गडावर विशेष असे काहीच नाहीये पडके बुरुज आणि चार पाच खोल्यांचे अवशेष आहेत. पण वरून दिसणारा नजरा काय वर्णू तैल-बैलाचे दोन बुरुज एका बाजूला कोकण आणि दूरवर पसरलेल्या डोंगररांगा सगळेच एकदम झकास होते. खूपच छान हवा सुटली होती त्यातच सूर्यदेवाने दर्शन दिले वर्षाचा पहिला सूर्य. गडाच्या बाजूलाच असणाऱ्या एक उंच कातळामागून सूर्यदेव वरती डोकावले सकाळचे आठ वाजले असतील त्या वेळी. मन प्रसन्न झाले थोडा वेळ फोटो काढले आणि गड उतरायला सुरवात केली. १० मिनटात रॉक पॅच उतरून खाली पोहोचलो सचिनची फोटोग्राफी चालूच होती. तिकडून दहा पंधरा मिनटात आम्ही गावात पोहोचलो. मी गाडीचा सायलेन्सर जरा टाइट बांधला (मागच्या एका ट्रीप मध्ये गाडी खड्ड्यात गेल्यामूळे फुटलाय बिचारा नवीन घालायचा तर सात हजार किंमत आहे पण मी बदलतोय लवकरच).अशक्य रित्या सकाळी ९ वाजता आमचा ट्रेक संपवून परतीची वाट पकडली. सचिनच्या विनंतीला मान देऊन आम्ही सहारा व्हली - आंबवणे मार्गे लोणावळा मध्ये निघायचे ठरले. रस्ता laich बेकार होता. रस्त्यात एक ठिकाणी एक अजब प्रकार घडला गाडी चालवताना मला एकदम रस्त्यावर हिरवे काहीतरी दिसले मला वाटले झाडाची छोटी फांदी नाहीतर वेल असेल पण तो चक्क हरणटोळ नावाचा साप होता मी ओरडलोच कारण इतके दिवस मी जंगलात कुठे दिसतोय का शोधायचो तर इथे साहेब चक्क रस्त्यावर...बर थांबून फोटो काढायचे तर सेकंदात गायब पण. मी पहिल्यांदाच हरणटोळ बघितला.

साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही लोणावळ्यात पोहोचलो तिकडे रामेश्वर हॉटेल मध्ये नाश्ता केला आणि १.०० वाजता पुण्यनगरीत पोहोचलो. तसे नवीन वर्षाचे एक संकल्प पण केला आहे इथून पुढच्या प्रत्येक ट्रेक मध्ये एक भगवा ध्वज घेऊन जायचे आणि तो तिकडे लावून यायचे.

नवीन वर्षाचे स्वागत करायची आमची हि पद्धत कशी वाटली ते प्रतिक्रियांमध्ये जरूर लिहा.

हाच ट्रेक पंकजच्या नजरेतून हे नक्की वाचा - इथे क्लिक करा . धनगड़ चा नकाशावर पाहण्यासाठी इथे क्लिक करा