शनिवार, ५ जून, २०१०

Woodstock Outing Gallery

Thanks to Prakash for letting me use his camera.

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

मी काढलेली पेन्सिल स्केचेस

         कॉलेजला असताना असाच टाईमपास म्हणून एक छोट्या डायरीमध्ये काही स्केचेस काढली होती परवा बऱ्याच दिवसांनी ती डायरी सापडली मग काय घरात स्कॅनर असल्यामुळे लगेच स्कॅन केली आणि आज पब्लिश करतोय. आवडली तर प्रतिक्रिया जरूर कळवा.आणि हो, हे शेवटीचे तीन चार ऑफिसमध्ये बसून काढले आहेत सोमवार, २२ मार्च, २०१०

घरच्या परसबागेतून भाग २

रेच दिवस झाले काहीच लिहिले नाही, काय करणार "आळस हा माणसाचा शत्रू असतो" पण बहुतेक सध्या माझा मित्र झाला असावा. हल्ली त्यामुळे ऑफिस झोप ऑफिस एवढेच चालू आहे..असो तर मागे एका पोस्ट मध्ये घरामागच्या परसबागेबद्दल लिहिले होते आज त्याचाच दुसरा भाग देतोय. भाग एक मध्ये फुलांच्या  आणि फळांच्या झाडांबद्दल लिहिले होते आज त्यांच्यामुळे येणाऱ्या पक्षांबद्दल देतोय आणि हो छायाचित्रे आहेतच जोडीला...

रोजचा दिवस उगवतो तो चिमण्यांच्या चिव-चीवाटाने जो दिवसभर चालूच असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या चिमण्या, पारवे, बुलबुल, पोपट, मैना हे हमखास दिसणारे पक्षी. पहिल्यांदाच दिसलेला हिरव्या रंगाचा तांबट पक्षी पण त्यात आहे आणि हे सगळे कुठे हि जंगलात पक्षी निरीक्षणाला न जाता अगदी घरच्या घरी बघायला मिळाले.

चिमण्यांची घर बांधण्याची धडपड, त्यात घातलेली अंडी मग त्याचे शत्रूपासून (मांजर किंवा साप) रक्षण करण्यासाठी केलेला दंगा, पिले झाल्यावर त्यांचा चिव-चीवाट, त्यांना भरवण्यासाठी केलेली पळापळ हे सगळे मी अनुभवले आहे. कोकिळेचा मधुर स्वर ऐकला आहे तर कावळ्याची काव-काव पण तेवढ्याच सुरात कानात घुसलीये. आणि हो गोड लागतात म्हणून पक्षांनी खाऊन अर्धी सोडलेली फळे पण खाल्ली आहेत. मागच्याच आठवड्यात मम्मीने बरेच चिक्कू दाखवले जे अर्धे खाऊन तसेच सोडले होते.

तर अश्या ह्या अनोख्या पक्षीविश्वाचे मी काढलेली छायाचित्रे देत आहे इकडे, आशा आहे तुम्हाला आवडतीलच..


 

  ता.क - वरती दिलेली सगळी छायाचित्रे माझ्या परसाबागेतली आहेत. माझी इतर काही पक्षांची छायाचित्रे इथे पहा

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

तिसऱ्यांदा विजयी

दंगा, धुडगूस, शिमगा सगळं होळीच्या एकदिवस अगोदरच करून झालं, म्हणजे कारणच तसे होते माझ्या क्रिकेट संघाने म्हणजे पटनी कॉम्पुटर सिस्टिम्सच्या संघाने मगरपट्टा मध्ये झालेल्या सायबरसिटी-२०१० क्रिकेट स्पर्धेत आम्ही सलग तिसऱ्या वर्षी विजयश्री खेचून आणली. ह्या वर्षीची फायनल मॅच E.D.S च्या संघाबरोबर होती तसा तोही मजबूतच संघ आणि त्यात विशेष म्हणजे दोन्ही संघ मिळूनच सराव करायचे त्यामुळे प्रत्येक खेळाडू कसा खेळतो हे माहित होतेच त्यामुळे जास्तीच दडपण.

सकाळच्या सत्रात उपांत्यफेरीत मगरपट्टा-ब संघाला धूळ चारली होती त्यामुळे सर्वांचा आत्मविश्वास उंचावला होता. नाणेफेक हरल्यामुळे पहिला गोलंदाजी करावी लागली. E.D.S ची सुरुवात चांगली झाली पण तिसऱ्याच शतकात पुनीतने पहिला महत्वाचा बळी घेतला आणि जसे काही E.D.Sच्या फलंदाजीला ग्रहणच लागले एकामागे एक फलंदाज परतत होते. क्षेत्ररक्षण खूपच छान झाले ते म्हणतात न "Catches win Matches" ते काही खोटे नाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. दहा षटकात ९ गडी गमवून जेमतेम ६० धावा केल्या त्यांनी.

दहा षटकात ६० धावा करायचे आव्हान घेऊन जेंव्हा पुनीत आणि स्वप्नील फलंदाजीला आले त्यावेळी अगदी पहिल्याच चेंडूवर पुनीतने जोरदार षटकार खेचत गोलंदाजाना आव्हान दिले आणि एक संदेशपण दिला कि लवकरच संपवतोय आम्ही. तिथेच न थांबता दोघांनी ३ शतकात २५ धावांची भागीदारी केली. स्वप्नील बाद झाल्यावर उतरलेल्या प्रशांतने पुनीतबरोबर उरल्यासुरल्या गोलंदाजांचे कंबरडे मोडून काढत अवघ्या ६ षटकात विजयश्री खेचून आणली. पुनीतने विजयी चौकार मारल्यावर दंगा धुडगूस सगळे पळत मैदानात सुटले स्टंप्स उखडल्या गेल्या, शर्ट हवेत उडाले, घोषणा चालू झाल्या थ्री चियर्स फॉर पटनी, क्रिकेट में मगरपट्टा का डॉन कौन पटनी पटनी वगेरे वगेरे...आणि यानंतर सुरुवात झाली फोटोसेशनची

बुधवार, २७ जानेवारी, २०१०

आमचा इडली प्रयोग

भारतातून इकडे येताना (इकडे म्हणजे अमेरिकेत) माझा मित्र रवीसाठी त्याच्या घरच्यांनी दिलेले इडलीपात्र घेऊन आलो. जेव्हा योगेशने ते बघितले तेव्हाच पट्ठ्याने घोषित केले कि घरी इडली बनवायची. गेल्या आठवड्यात एन.जे. ला जाऊन पण रवी चे भांडे दिले नाही (वहिनी ओरडत असणार माझ्या नावाने ). आम्ही ठरवले की तांदूळ आणि उडीद भिजत घालायचे आणि दुसऱ्यादिवशी बारीक करून परत पीठ आंबत ठेवायचे. पण वेळच मिळत न्हवता.

 काल ऑफिस मधून घरी येताना इंडिअन स्टोअर मधून इडली रवा आणि उडीदाचे पीठ आणले. रात्री त्यानेच दोन्ही पीठ मिसळून भिजत ठेवले. सकाळी उठून मी मस्त चटणी बनवली (थोडा लसून जास्ती झाला दिवसभर तोंडाचा वास गेला नाही). प्रयोग म्हणून एकाच घाना काढायचे ठरले मग इडली पात्रात पीठ भरून शिजवायला ठेवले. पंधरा मिनटात इडली तयार. बघितले किती कमी कष्ट लागतात ते. एखाद्या अण्णाच्या हॉटेल ला लाजवेल अशी झकास इडली बनली होती. नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी फोटो काढून लिमिटेड एडिशन इडली संपवून टाकली. वीकेंड ला मंडळासाठी बनवायचा प्लान आहे जोपर्यंत भांडे आहे तोपर्यंत चान्स पे डान्स मारून घेतो :-)

बघा जमते का तुम्हाला सोप्पे आहे
साहित्य - इडली रवा, उडीद पीठ आणि इडली पात्र. चटणी साठी ओले खोबरे, डाळे (भिजवून घ्या), कोथिंबीर, लसून आणि हिरव्या मिरच्या
कृती - रात्री किंवा सकाळी पण बनवायच्या अगोदर ७-८ तास दोन्ही इडली रवा आणि उडीद पीठ चांगले एकजीव भिजवून आम्बवण्यासाठी ठेऊन द्या. थोडे दही घातले तरी चालेल. पीठ आंबले की भांड्याला थोडे तेल लावून त्यात ते पीठ भरा. पात्रात पाणी ओतून इडल्या ठेऊन द्या. पंधरा मिनिटे शिजत ठेवा. तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी वर दिलेले साहित्य मिक्सर ला बारीक वाटून घ्या. इडल्या बाहेर काढा. जास्ती वाट न बघता संपवून टाका. :-)तुम्हाला हा पोस्ट आवडला तर हा पण पहा - कोल्हापुरी फ्रेंच टोस्ट

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

माझा अमेरिका प्रवास

पोहोचलो एकदाचा अमेरिकेत, हो पण त्यासाठी २६ तासांचा खडतर प्रवास करावा लागला राव. पहिल्यांदा येताना जितकं कुतुहूल, उस्चाह होता तितका ह्यावेळी न्हवता म्हणूनच घरच्यांना पण सांगितले होते सोडायला वगेरे यायची गरज नाही माझा मी जाईन. खरेदी पण काही केली नाही एक महिना तर यायचे होते आणि योगेश, विपिन, झएद अशी मित्रमंडळी होतीच ज्यांनी सांगून ठेवलेच होते फक्त कपडे आणि मिठाई घेऊन ये म्हणून. काका हलवाई मधून खूप सारी मिठाई खरेदी केली बाकी किरकोळ खरेदी बिग बजार मधून केली. अगदी आधल्या दिवशीच सूटकेस भरली. त्याची पण एक स्टोरीच होती माझ्या दोन्ही सुटकेस अमेरिकेत मग मित्राच्या घेऊन आलो.

सोमवारी रात्री उशिरा म्हणजे मंगळवारी पहाटे २ ला विमान निघणार होते मग उगाच स्पेशल गाडी करण्याची तसदी नाही घेतली (ह्यावेळी कॉस्ट कटिंग करावे म्हंटले). महामंडळाच्या शिवनेरीचे तिकीट बुक केले इंटरनेट वरून. (कसे करायचे माहित नसेल तर इथे क्लिक करा). सोमवारी ऑफिसला जावेच लागले काय करायचे अजून तिकीट मिळाले न्हवते (ऑफिस मध्ये दोन तीन विभाग अशे असतात की जे सरकारी पेक्षा विचित्र वागतात) तर दुपारी १२ ला तिकीट मिळाले. आता अमेरिकेला जायचे म्हणून शूज ड्राय क्लिनिंग ला दिले होते ते मिळायला दोन वाजले. घरी येऊन दोन चार घास पोटात टाकले आणि स्वारगेट ला पोहोचलो. चारला म्हणजे चारलाच शिवनेरी ने प्रयाण केले.

साधारण ७.३० च्या दरम्यान मी आएरोलि मध्ये उतरलो. ठरल्याप्रमाणे मुबारक आला होताच . दोन मिनटात त्याच्या रूम मध्ये पोहोचलो आणि जेवायला बाहेर पडलो . नुकतीच त्याने यामाहाची फेजर नावाची गाडी घेतली आहे चालवून बघितली, मस्त वाटली . परत आल्यावर थोडे दिवस गाडी अदलाबदली करू असे सांगून टाकले त्याला . तिथेच जवळ एका हॉटेल मध्ये जेवण केले. गरम मसाला नाव होते हॉटेलचे काय मस्त तंदुरी चिकन ,चिकन टिक्का मसाला, मुर्ग लाहोरी दिले म्हणता थोडाच खाणार होतो पण राहवलेच नाही..9 च्या दरम्यान जेवण झाले. अमीन मागे लागला होता अजून भरपूर वेळ आहे आमचे  म्हणजे पटनीचे मुंबई मेन ऑफिस जे नव्यानेच आयरोलीमध्ये चालू केले आहे ते  बघून येऊ. नको म्हंटले तरी एकेनाच मग तिकडे जाऊन आलो जवळच होते छान आहे मोठे आहे. पुढच्या वेळी आतून बघेन.

९.३० च्या दरम्यान आम्ही एअरपोर्ट साठी निघालो अपेक्शेपेक्षा लवकर म्हणजे १०.३० लाच पोहोचलो. थोड्या वेळाने मंगेशपण आला. अर्धातास गप्पांमध्ये गेला, सोमवार असून पण एअरपोर्टला खूप गर्दी होती. तिकडे जॉन ला त्याच्या ऑडी मधून जाताना पाहिलं काय माहित आला असेल कोणाला तरी सोडायला नाहीतर निघाला असेल कुठे तरी.

११ च्या सुमारास कार्यकर्त्यांचा निरोप घेऊन आत प्रवेश केला. एअर इंडिया ची फ्लाईट होती मनात असे बसले होते कि देसी आहे म्हंटल्यावर बेकार सर्विस, बकवास विमान, म्हाताऱ्या एअर होस्टेस वगेरे वगेरे..आणि दुसरे कारण म्हणजे बोर्डिंग पास घेण्यासाठी एक तर भली मोठी रांग आणि त्यात ती काकू बराच वेळ घेत होती त्यात मुंबई एअरपोर्ट ला एसी चा पत्ता नाहीये नावालाच अंतरराष्ट्रीय. बोर्डिंग पास घेऊन इमिग्रेशन आणि सुरक्षा चाचणी करून टर्मिनलला गेलो. मला वाटले होते जरा कडक चेकिंग होईल पण नाही तेच आपले नेहमीचे. अजून दोन तास होते त्यामुळे मस्त एका खुर्चीवर ताणून दिली. अजून काउंटर ला कोणीच आले न्हवते एका अर्धा तास अगोदर एक सफाई कामगार आला आणि म्हणाला तुम्हाला गेट ७ ला जावे लागेल तिथून बोर्डिंग होणार आहे अधिकृत घोषणाच झालीच नाही सगळे गेट ३ वरून ७ ला आलो तर इथे कोणीच नाही. कोणा एका दुसऱ्या एअरलाईनचे बोर्डिंग चालू होते लोकांनी त्या बिचाऱ्या पोरीला प्रश्न विचारून त्रास दिला. शेवटी एक २० मिनिट अगोदर एक पोलीस काका आले आणि त्यांनी माफी मागून बोर्डिंग चालू केले.

साधारण १.४५ ला विमानात प्रवेश केला आणि आश्चर्याचा धक्का बसला नवीनखट्ट बोईंग ७७७ विमान होते. नव्या कोऱ्या छान सीट्स, इकॉनॉमी मध्ये पण भरपूर लेग स्पेस आनंद वाटला. सीट खिडकी कडेची होती त्यामुळे अडचण न्हवती. शेजारी एक इटालीअन पण अमेरिकेत स्थाईक बाई येऊन बसल्या आणि त्यांच्या पलीकडेच अमेरिकेत शिकत असणारा गोव्याचा नझीर. थोड्याच वेळात आमच्या गप्पा चालू झाल्या. विमान लेट झालेच साधारण ३ च्या दरम्यान विमानाने उड्डाण भरले आणि माझी अमेरिका यात्रा सुरु झाली. (छायाचित्र मी काढले नाहीये गुगल इमेज सर्च मधून घेतले आहे)     विमानाचा फ्रंन्कफर्ट मध्ये हाल्ट होता दोन तासाचा तिथे पोहोचायला एक तास लेट झाला. जरी आम्ही त्याच विमानाने पुढे जाणार असलो तरी उतरावे लागले का तर म्हणे अमेरिकेत येणारा प्रत्येक प्रवासी डबल चेक झाला पाहिजे. चेकिंग पण कडक होते, एक न एक प्रवासी आणि प्रत्येकाची सुटकेस उघडून पहिली जात होती. चार तर गेले त्यात परत लेट. लोकल वेळेनुसार आम्ही काहीतरी सकाळी ६.३० ला पोहोचलो होतो आणि ९ ला वगेरे उड्डाण केले शिकागो साठी. शिकागो ला आम्ही सकाळी १०.५० ला पोहोचायला हवे होते पण १२.०० वाजले माझी तर दुसरी फ्लाईट होती १.२३ ला. बहुतेक चुकणार असे वाटले कारण १२ ला उतरून इमिग्रेशन, कस्टम, त्यानंतर सुटकेस चेक करावी लागणार होती आणि मग डोमेस्टिक टर्मिनल जे दुसऱ्या टोकाला होते तिकडे जावे लागणार होते.


सुदैवाने कुठेही अडचण आली नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे १२.५३ ला मी युनायटेड च्या विमानात प्रवेश केला बहुतेक माज्यासाठीच ते थांबले होते ते. मी आलो नी आम्ही निघालो. बरोबर सायंकाळी ४.३० ला प्रोव्हीडन्स ला पोहोचलो. विपिन आणि योगेश येणार होते घ्यायला पण नंतर समजले कि ते कुठे तरी रस्ता चुकले. तसे नीलम आणि झएद त्यांच्या अगोदरच आले होते. मी माझ्या चेक इन सुटकेस ची वाट बगत होतो पण आलीच नाही बहुतेक शिकागो मधेच राहिली. मग तिकडे नोंद केली आणि त्यांनी उद्या घरपोच मिळेल म्हणून सांगितले.


घरी येऊन मस्त चहा पोहे खाल्ले २६ तासांच्या प्रवासाने डोके जम झाले होते. जास्ती झोप पण मिळाली नाही अपेक्शेपेक्षा चागली सर्विस दिली एअर इंडिया ने एअर होस्टेस चा अपवाद सोडला तर सगळे चांगले होते. दोन मराठी चित्रपट पण होते पण मी २ हिंदी आणि एक इंग्लिश बघितला. नझीरशी चांगली ओळख झाली त्यामुळे एकटे एकटे वाटले नाही. दोघे पण (बहुतेक सगळेच प्रवासी) कंटाळून गेलो होतो.. कुठे हि सेक्यूरिटी चेक चा जास्ती त्रास झाला नाही..फक्त थोडा जेट ल्याग झाला आहे म्हणूनच रात्री ४ ला हि पोस्ट सबमिट करतोय..

लवकरच पहिल्या विमान प्रवासात (माझा दुसरा असल्यामुळे थोड्याफार गोष्टी माहित झाल्या आहेत) घ्यावयाची काळजी आणि काय करावे आणि काय करू नये ह्यावर एक लेख लिहितोय..

रविवार, १७ जानेवारी, २०१०

छायाचित्रे मराठी ब्लॉगर्सच्या स्नेहमेळाव्याची

रात्रीचे दोन वाजतोय उद्या म्हणजे आजच कि हो अमेरिकेसाठी निघायचे आहे पण फोटो टाकल्याशिवाय राहवत नाहीये. .अहो कारणच तसे आहे. आजच एका ऐतहासिक पर्वाची सुरुवात पुण्यातील पु ला देशपांडे बागेत झाली. चार पाच लोकांनी एकत्र येऊन मराठी ब्लॉगर्स चा स्नेहमेळावा घडवून आणला. थोडे थोडके नाही तर चक्क ६०-७० लोकांनी हजेरी लावली. म्हणजे फक्त ब्लॉग लिहिणारेच नाही तर सुजन वाचक, पत्रकारिता व टी.व्ही, क्षेत्रातील मान्यवर तसेच ज्यांना ब्लॉग म्हणजे काय हे माहित पण नाही अश्यानी सुद्धा कुतूहलापोटी हजेरी लावली. जास्ती लिहित बसत नाही कारण तेवढा वेळ पण नाहीये...ह्या मेळाव्याचा सविस्तर वृतांत पंकजच्या ब्लॉगवर वाचण्यासाठी  इथे क्लिक करा. काही महत्वाच्या घटना इथे वाचा सुरेश पेठे काका जे मुळ कल्पने मागे होते त्यांचे मनोगत इथे वाचाइ-सकाळची ताजी बातमी वाचण्यासाठी  आणि व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा . आभार प्रदर्शन वाचण्यासाठी इथे जा.

काही फोटो देत आहे खाली आवडले तर जरूर कळवा..धन्यवाद आता पुढील भटकंतीचे पोस्ट अमेरिकेतूनच तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद.


हे फोटो इतरांबरोबर शेअर करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

एस.टी. इंटरनेट रिझर्वेशन

 हो एसटी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची जी गेल्या ६० वर्षांपासून अखंड आणि सुधारित सेवा देण्याचा पर्यंत करीत आहे त्यांनी एक पाऊल पुढे येऊन नुकतीच इंटरनेटवरून रिझर्वेशन ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. "गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस.टी." या ब्रीदवाक्यानूसार संपूर्ण राज्यात आपले जाळे विणले आहे. लाल डब्बा अशी ख्याती असलेल्या या विभागाने आपली कात टाकून आधुनिक व्होल्वो बसेस, नवीन प्रकारच्या परिवर्तन बसेस आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत.नुकताच ह्या नवीन सेवेसाठी रजिस्टर केले. खूप साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. सर्वप्रथम एम.एस.आर.टि.सी. च्या संकेतस्थळावर जा. http://www.msrtc.gov.in . उजव्या बाजूला तुम्हाला खाली दिलेली इमेज दिसेल तिकडे क्लिक करा.


एक नवीन विंडो ओपन होईल. नवीन युझर असाल तर एक वेळ रजिस्टर करावे लागेल. तुम्ही निवडलेल्या युझरनेम आणि पासवर्ड ने लॉगीन करा. तुमचा प्रवास निश्चित करा आणि प्रवाश्यांची माहिती भरा. पेमेंट साठी तुमच्याकडे क्रेडीट कार्ड असणे आवश्यक आहे. एकदा पेमेंट झाले कि तिकीटाची प्रिंट घ्या तेच तिकीट तुमच्या ई-मेल वरती पण येईल. आहे न सोप्पे. आणखी माहिती साठी इथे बघा http://public.msrtcors.com/ticket_booking/Help.html

तर कधी बुक करताय तुमचे पहिले एसटी ई-तिकीट?शनिवार, २ जानेवारी, २०१०

धनगड अका घनगड आणि नव वर्ष

पहिल तर तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बहुतेक सर्वजण ३१ डिसेंबरची रात्र जागून नव्या वर्षात झोपी गेले असणार पण आमचा प्लान काही वेगळाच होता. वर्षाची सुरवात ट्रेक ने करायची आणि पहिला सूर्य बघायला निसर्गात जायचे. पहाटे ४ ला निघून आम्ही पौड मुळशी ताम्हिणी लेक-४९ करत धनगड (घनगड) सर केला. ह्या आमच्या वेडाबद्दल थोडेसे..

३१ डिसेंबर ची रात्र इतकी काही चांगली गेली नाही पार्टी, डी.जे. जेवण सगळेच बकवास होते. दुपारपासून पंकजच्या मागे लागलो होतो नवीन वर्षाची सुरवात ट्रेक ने करू तसा प्लान बी पण तयार होता. पण रात्री ११ ला त्याचा फोन आला कि धनगड ज्यालाच घनगड असे पण म्हणतात तिकडे जाऊ. त्याने झोपताना एक लिंक पाठवली होती ज्यात गडाबद्दल माहिती होती. तरी १ वाजता त्याने फोन केलाच ४ वाजता जे एम रोड ला भेटू म्हणून. प्रॉब्लेम एकच होता गाडीत पेट्रोल न्हवते. पहाटे ४ ला मी जे एम रोड ला पोहोचलो पंकज निघाला होताच वाटेत त्याला आर टी ओ चा पेट्रोल पंप चालू दिसला मी लगेच तिकडे पोहोचलो चला एक काळजी मिटली होती. त्याची गाडी पार्क करून आम्ही चांदणी चौक च्या दिशेने निघालो. वाटेत अमृतेश्वर चा चहा पिला. सचिन (अपर्चर जंकी) येतोय म्हणून पंकज ने सांगितले मग त्याची वाट बघितली चांदणी चौक ला. त्याला यायला १०-१५ मिनिटे लागले त्याचा पण पेट्रोल प्रॉब्लेम होताच. लकीली जवळच कुठेतरी भेसळयुक्त का होईना पण पेट्रोल मिळाले. बरोबर ५ च्या दरम्यान आम्ही ताम्हिणी च्या दिशेने कूच केली.३० किमी च्या बम्पी राईड नंतर (म्हणजे रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था होती) मुळशी धरणाच्या मागे कुठेतरी आम्ही ब्रेक घेतला पौर्णिमेचा पूर्ण चंद्र मावळतीला निघाला होता त्याचे सुंदर प्रतिबिंब मुळशी च्या पाण्यात पडले होते मागचे डोंगर पण त्यांचे अस्तित्व दाखवत होते. असे दृश्य आणि फोटो नाही काढायचे म्हणजे काय तिघांचे कॅमेरे बाहेरे निघाले पटकन फोटो काढले आणि पुढे निघालो.
धनगड साठी तुम्हाला ताम्हिणी गावानंतर पुढे एका आश्रमासाठी एक उजव्या बाजूला वळण घ्यावे लागते तोच रस्ता पुढे लोणावळ्याला पण जातो. चांदणी चौक पासून ७० किमी अंतरावर असणाऱ्या एकोले गावात पोहोचावे लागते. रस्त्यात नवरा-नवरी डोंगर पण लागतो. म्हणजे ३ सुळके आहेत ज्याला नवरा नवरी आणि मध्ये भटजी अशी नवे आहेत. तिकडून तैल-बैल ची शिखरे पण दिसतात.


साधारण ७ च्या दरम्यान आम्ही एकोले मध्ये पोहोचलो. थंडी तर होतीच सोबत हवा पण चालू होती. गाव (चार पाचच घरे होती) तसे अर्धे कच्चे जागे झाले होते. आम्ही एका घरात हेल्मेट्स ठेऊन गड चढायला चालू केली. १० च मिनटात गाजराईचे मंदिर लागते तिथून पुढे पाचच मिनटात तुम्ही स्टेज १ ला पोहोचता म्हणजे धनगड आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या डोंगर मध्ये एक जागा आहे जिकडून दोन्ही बाजूचे परिसर आणि डोंगर रांगा दिसतात. तिथून तुम्ही धनगड मध्ये प्रवेश करता. प्रवेशालाच दोन गुहा आहेत जिकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते तिकडेच देवीची एक मूर्ती आहे एक मोठी शिळा पण पडली आहे. आता इथून वरती जाण्यासाठी एक वीस फुटाचा रॉक पॅच आहे तसा अवघड नाहीये पण तसा सोप्पा पण नाहीये. पंकज अगोदर वरती गेला आणि तिकडे असणाऱ्या हुकला रोप बांधला. मी सचिन ला वरती चढवायचा पर्यंत केला पण तो म्हणाला मी इकडेच थांबतो मग मी आणि पंकज वरती जायचे ठरले.


गडावर विशेष असे काहीच नाहीये पडके बुरुज आणि चार पाच खोल्यांचे अवशेष आहेत. पण वरून दिसणारा नजरा काय वर्णू तैल-बैलाचे दोन बुरुज एका बाजूला कोकण आणि दूरवर पसरलेल्या डोंगररांगा सगळेच एकदम झकास होते. खूपच छान हवा सुटली होती त्यातच सूर्यदेवाने दर्शन दिले वर्षाचा पहिला सूर्य. गडाच्या बाजूलाच असणाऱ्या एक उंच कातळामागून सूर्यदेव वरती डोकावले सकाळचे आठ वाजले असतील त्या वेळी. मन प्रसन्न झाले थोडा वेळ फोटो काढले आणि गड उतरायला सुरवात केली. १० मिनटात रॉक पॅच उतरून खाली पोहोचलो सचिनची फोटोग्राफी चालूच होती. तिकडून दहा पंधरा मिनटात आम्ही गावात पोहोचलो. मी गाडीचा सायलेन्सर जरा टाइट बांधला (मागच्या एका ट्रीप मध्ये गाडी खड्ड्यात गेल्यामूळे फुटलाय बिचारा नवीन घालायचा तर सात हजार किंमत आहे पण मी बदलतोय लवकरच).अशक्य रित्या सकाळी ९ वाजता आमचा ट्रेक संपवून परतीची वाट पकडली. सचिनच्या विनंतीला मान देऊन आम्ही सहारा व्हली - आंबवणे मार्गे लोणावळा मध्ये निघायचे ठरले. रस्ता laich बेकार होता. रस्त्यात एक ठिकाणी एक अजब प्रकार घडला गाडी चालवताना मला एकदम रस्त्यावर हिरवे काहीतरी दिसले मला वाटले झाडाची छोटी फांदी नाहीतर वेल असेल पण तो चक्क हरणटोळ नावाचा साप होता मी ओरडलोच कारण इतके दिवस मी जंगलात कुठे दिसतोय का शोधायचो तर इथे साहेब चक्क रस्त्यावर...बर थांबून फोटो काढायचे तर सेकंदात गायब पण. मी पहिल्यांदाच हरणटोळ बघितला.

साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही लोणावळ्यात पोहोचलो तिकडे रामेश्वर हॉटेल मध्ये नाश्ता केला आणि १.०० वाजता पुण्यनगरीत पोहोचलो. तसे नवीन वर्षाचे एक संकल्प पण केला आहे इथून पुढच्या प्रत्येक ट्रेक मध्ये एक भगवा ध्वज घेऊन जायचे आणि तो तिकडे लावून यायचे.

नवीन वर्षाचे स्वागत करायची आमची हि पद्धत कशी वाटली ते प्रतिक्रियांमध्ये जरूर लिहा.

हाच ट्रेक पंकजच्या नजरेतून हे नक्की वाचा - इथे क्लिक करा . धनगड़ चा नकाशावर पाहण्यासाठी इथे क्लिक करा