मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

पुरेपूर कोल्हापूर

पुरेपूर कोल्हापूर हॉटेलचे जे मेनू कार्ड आहे त्याच्या शेवटच्या पानावर मला हि कविता मिळाली. तिकडेच बसून ऑर्डर ची वाट वाट बगत मोबाईल मध्ये टाईप करून घेतली तीच इकडे देत आहे. कोणी लिहिली माहित नाही पण कवीतेचा एक आणि एक शब्द खरा आहे. वाचून बघा तुम्हाला नक्की आवडेल..

"खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर...
मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर...


रंकाळ्याचा वारा कोल्हापूर...
पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...


खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...
जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...


चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर...


मिसळीचं वाटण कोल्हापूर...
पांढ-या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...


विन्या मिल्या पश्या कोल्हापूर...
पम्या पक्या दिप्या कोल्हापूर...


शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...
राजकारणातील गेम कोल्हापूर...


शाहिरीचा बाज कोल्हापूर...
गळ्यातला साज कोल्हापूर...


मातीमधलं पसरलेलं घोंगडं कोल्हापूर...
नखशिखांत रांगडं कोल्हापूर...


ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...
शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...


क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपूर
ते.... माझं कोल्हापूर... "