बुधवार, १६ डिसेंबर, २००९

घरच्या परसबागेतून भाग १


आजकाल लोकांनी फेसबुक वर मोठ्या प्रमाणावर शेती करायला चालू केली आहे. हो म्हणजे जर तुम्हाला माहित नसेल तर फेसबुक वर फार्मव्हिले नावाचा एक प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी थोडी जागा आणि थोडे भांडवल दिले जाते ते वापरून तुम्ही नांगरणी, पेरणी, पशुपालन वगेरे वगेरे करून शकता, धान्याची विक्री करून पैसे कमवू शकता. तर मी सुद्धा हल्लीच हे सगळे करून पहिले मस्त वेळ जातो पण येवढा वेळ नाहीये राव.

फार्मव्हिले वरून आठवले माझ्या घरच्या रिकाम्या जागेत माझ्या मम्मी पप्पानी अशीच हौस म्हणून वेगवेगळी झाडे लावली आहेत. काही बिया पडून उगवली तर काही लावली आहेत. म्हंटले ह्या निमित्ताने आज लिहावेच जरा. तसे नेहमी घरी गेलो की मी एक तासभर घरच्या परसबागेत घालवतोच, पण कॅमेरा घेऊन. तिकडे येणार वेगवेगळे पक्षी टिपतो. आमच्या परसबागेत अगदी मोठ्या वृक्षांपासून छोटे छोटे सिझनल वेल पण आहेत. मी काही फोटो काढलेत ते इकडे देतोय.

सुरवात आंब्यांपासून करतो. असेच एक पडके झाड उगवून आले आणि बघता बघता मोठे हि झाले. दर वर्षी एक शंभरबर आंबे निघतात. फोटो पाहून आकाराची कल्पना आली असेलच, तरी हे कच्चे आहेत..

सीताफळ - घराच्या भोवती एक ५ ते ६ झाडे आहेत. सिझन मध्ये सगळी झाडे लग्गडलेली असतात. माझी मम्मी लोकांना देऊन देऊन कंटाळते. पक्ष्यांची तर मेजवानीच असते खासकरून बुलबुल पक्षी अर्धे खाऊन फळ झाडाला सोडण्यात पटाईत आहे.

चिक्कू - एकच झाड आहे पण खूप लागतात आणि त्याची गोडी काही वेगळीच आहे

जांभूळ - सिझनल, मला झाडावर चढून खायला आवडतात. आमच्या शेजारचे पाटील सर (म्हणजे ते ११-१२ विला मला गणित शिकवायचे) ते सुद्धा झाडावर चढून जांभळे काढतात. बरीच खराब होऊन खाली पडून जातात कारण काही ठिकाणी तुम्ही पोहचू शकत नाही झाड लवचिक असते आणि पडायचा धोका असतो.


बदाम - अलीकडेच बदमे लागायला सुरुवात झाली आहे. पण बदमापेक्षा त्याच्या सावलीचा खूप उपयोग होतो आणि असे पण एवढ्या उंच झाडावरून बदमे काढायचे कष्ट कोणी करत नाही. एकतर काठीने पाडा नाहीतर मग दगड आहेतच :-)

लिंबू - विकत आणावे लागत नाहीत इतके तरी निघतातच

दोडका - असाच एक पडीक वेल भाव खाऊन गेला. चार पाच वेळा नक्कीच झाली असेल भाजी. मला आवडत नाही सो जास्ती लिहित नाहीये

कडू कारले - अगदीच कहर केला ह्या सिझनला, शेजारी पण कंटाळले असतील, मम्मीने तर तिच्या सगळ्या स्टाफ ला वाटले असतील. पण परत मी खात नाही सो जाऊदे. अजूनही आहेत पाहिजे असतील तर सांगा घेऊन येईन पुढच्यावेळी गेलो की.


टोम्याटो - कुठे तरी एखादे झाड उगवले होते. दिसला म्हणून फोटो काढला.

कोरफड - मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे

बाकी मग नारळाचे एक झाड आहे ज्याला जास्त नाही पण मोजके नारळ लागतात. तसेच चिंचा, हो चिंचेचे झाड आहे झाड कसले वृक्षच आहे तो अगदी घराच्या भिंतीपासून तीन फुट अंतरावर आहे बरेच लोक म्हणतात घराला बाधा होईल मुळ्या भिंतीमध्ये शिरतील वगेरे पण आम्ही  ते कापले नाही. खूप चिंचा लागतात. मम्मी छान मीठ लावून गोळे बनवून ठेवते. राहिलेल्या जो मनुष्य काढायला येतो त्याला आम्ही देऊन टाकतो. फळांबरोबर फुलांची पण खूप झाडे आहेत. झेंडू, निशिगंध, गुलाब, मोगरा, जास्वंदी, अबोली आणि मे फ्लावर सुद्धा.


तर आवडली का माझ्या मम्मी पप्पानी जपलेली परसबाग. मग कधी येताय बघायला. पुढच्या भागात परसबागेतल्या पक्ष्यांबद्दल लिहीन.