मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

कोल्हापुरी फ्रेंच टोस्ट

    खाल्लाय का कधी? परवा म्हणजे शनिवारी (तसा मी वीकेंड ला कधीच काम करत नाही पण इलेक्शनची सुट्टी खाल्ल्यामुळे नाईलाज होता) ऑफिस कॅन्टीनच्या मेनू मध्ये फ्रेंच टोस्टचा पर्याय बघितला आणि डी. वाय. पाटील कॉलेजची आठवण आली. मी कोल्हापूरला असताना कॉलेजच्या होस्टेल मध्ये एक टपरी होती तिकडे सुनीलच्या हातचा फ्रेंच टोस्ट अगदी फेमस होता. नाव काढले तरी चव अजूनही तोंडावर रेंगाळते. दोन मिनिटात बऱ्याच गोष्टी डोळ्या समोरून गेल्या. राहवले नाही म्हणून लगेच ऑर्डर केला. कॅन्टीनवाल्याने दोन पावाचे तुकडे जे अंड्यामध्ये भाजले होते ते गरम करून आणून दिले म्हटले हे काय दिलेस रे बाबा? तो म्हणाला फ्रेंच टोस्ट आहे सर... त्याला म्हटले भावा कोल्हापूरला ये तुला फ्रेंच टोस्ट काय असते ते खायला घालतो. घरी फ्रेंच टोस्ट बनवायचे मनात ठरवून कसे तरी ते दोन पावाचे तुकडे आत ढकलले.

रविवारी सकाळी P@P ची मीटिंग होती सकाळी आठ ते दहा तिकडेच वेळ गेला त्यानंतर पण टी-शर्ट चे फिक्स करता करता एक वाजला. रूमवर आलो तर राशन संपलेय असे आधीच कार्यकर्त्यांनी सांगून ठेवले होते मग सावकार ला घेऊन बिग बजार ला गेलो झाले परत येईपर्यंत तीन वाजले अजून जेवणाचा पत्ता न्हवता. रूमजवळ आलो आणि सावकारला बेकरीत म्यगी घ्यायला सांगितले पण अचानक फ्रेंच टोस्ट ची आठवण आली. मग काय लगेच बेत बदलून अंडी, सॉस, कांदे, बनपाव अशी खरेदी करून रूमवर आलो. पाककृती जरा जरा आठवत होती कारण बऱ्याचदा सुन्या ला तयार करताना बघीतले होते. पाककृती द्यायचा पर्यंत करतोय...


 
पदार्थाचे नाव - कोल्हापुरी फ्रेंच टोस्ट
साहित्य- बनपाव २, अंडी ४, कांदे २, चिली सॉस एक वाटी, मीठ, चटणी, कोथिंबीर, जिरे, तेल


कृती -


बनपाव मधून कापुन घ्या (आडवे काप करा) म्हणजे चार तुकडे तयार होतील. चारी अंडी फोडून चांगली फेटून घ्या. एका प्लेटमध्ये अंड्याचे मिश्रण काढा. कडई मध्ये तेल ओतून थोडे तापू द्या. तेल तापले कि बनपावाचा एक एक तुकडा अंडे टाकलेल्या प्लेट मध्ये बुडवून घ्या आणि ऑम्लेट सारखे भाजून घ्या. चारी तुकडे भाजून झाले कि मग त्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्या. कांदा टोम्याटो पण बारीक कापून घ्या.
         त्यानंतर कढईत दोनतीन चमचे तेल घालून हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्या फोडणीत चिरलेला कांदा-टोम्याटो घालून तो चांगला परतून घ्या. सॉस मध्ये जरासे पाणी टाकून ते कढईतल्या मिश्रणात टाका, हवी तेवढी चटणी टाका (कोल्हापुरी म्हणजे झनझनीत पाहिजे ना म्हणूनच हवी तेवढी टाका). मिश्रण चांगले हलवून घ्या. आता ह्यामध्ये अंडे लावलेल्या बनपावाचे काप टाकून चांगले हलवा. चवीनुसार थोडे मीठ टाका विसरला तरी हरकत नाही परत वरून घेता येते. हो आणि जर ड्राय वाटत असेल तर सॉस टाका. चांगले एकजीव झाले कि मग त्यावर कोथिंबीर टाकून लागलीच गरम गरम खायला घ्या..

हे बघा फायनल प्रॉडक्टबघा सुटले ना तोंडाला पाणी..मग कधी येऊ फ्रेंच टोस्ट खायला? आणि हो वाचून झाले कि कमेंट्स नक्की करा