रविवार, २७ सप्टेंबर, २००९

सागरी किनारा सफर - Coastal Prawl 2009

ता हे काय नवीनच असे तुम्हाला वाटेल पण नवल वाटून घेऊ नका, होय आम्ही निघालोय महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याची सफर करायला. आतापर्यंत सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत सगळी तयारी पूर्ण जाली आहे आणि फक्त चारच दिवस राहिलेत. मागच्या वर्षी पंकज आणि त्याच्या मित्रांनी ह्या सफरीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे आणि आम्ही आता दुसरा टप्पा पार करतोय. अंतर खूप आहे आणि वेळ तसा कमीच आहे म्हणजे कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडेल नाही का?.

तर ह्या सफरीची सुरवात आम्ही कोल्हापूरवरून करतोय म्हणजे तसे आम्ही पुण्यातूनच जाऊ पण आमच्या बाईक्स आम्ही ट्रान्सपोर्ट करतोय पुण्याहून कोल्हापूरपर्यंत ते पण फक्त वेळेअभावी. १ ऑक्टोबर ला सायंकाळी ७ बाईक्स टेम्पो मध्ये चढवल्या जातील ज्या पुढे जातील आणि आम्ही १४ लोक रात्री कोंडुसकर ने कोल्हापूरसाठी निघू.थोडक्यात प्लान द्यायचा पर्यंत करतोय. इथून पुढचा जो प्लान आहे तो बनवण्यासाठी मी पंकज, श्रीकांत आणि संदीपने मिळून ४ तास घालवलेत. वेगवेगळे नकाशे, गुगल, पंकजचे मित्र, काही जुने अनुभव यांची सांगड घालून हा प्लान तयार झाला आहे. त्यात उदयने बनवलेल्या शिऱ्याची साथ पण होती. तर पूर्ण सफर हि चार दिवसांची आहे. २ तारखेला पहाटे कोल्हापूरमधून सुरवात करायची आणि ५ तारखेला पुण्यामध्ये शेवट करायचा.

२ तारखेला सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही राधानगरी रोडने फोंडा घाटातून कणकवली गाठायचे किंवा गगनबावडा करूळ घाटातून जायचे. बारापर्यंत मालवणला पोहचून सिंधुदुर्गबघून घ्यायचा. परत मालवणमध्ये यायचे जेवण करून देवगड साठी निघायचे. साधारण ५ पर्यंत देवगडला पोहचून देवगडचा किल्ला आणि तिकडचा दीपस्तंभ बघायचा आणि देवगड मधेच पहिला मुक्काम करायचा.

३ तारखेला सकाळी लवकर उठून विजयगड पहायचा आणि परत देवगड मध्ये येऊन दुपारचे जेवण जाले की पूर्णगडकडे वाटचाल करायची. सायंकाळी पूर्णगड बघून पुढे पावस मार्गे रत्नागिरीला दुसऱ्या मुक्कामाला पोहचायचे.

४ तारखेला पहाटे लवकर उठून जवळच असलेल्या गणेशगुळेचा बीच बघून यायचे. खूप सुंदर ठिकाण आहे म्हणे गणेशगुळे. तिकडून परत रत्नागिरीत यायचे आणि आवरून रत्नागिरीजवळ असलेल्या रत्नदुर्ग-भगवती ह्या शेजारी शेजारी असलेल्या दुर्गांचे दर्शन घ्यायचे. ते करून लगेच गणपतीपुळे कडे प्रस्थान करायचे. रत्नागिरी-गणपतीपुळे हे ३० किमी चे अंतर पूर्ण करून गणपतीचे दर्शन घ्यायचे आही परत जयगडला जायचे. साधारण ४ पर्यंत जयगड बघून पुढे वेळणेश्वरला मुक्काम करायचे ठरले आहे पण जयगड ते वेळणेश्वर मध्ये एक खाडी आहे जर आम्हाला फेरी मिळाली तर काम सोप्पे होईल नाहीतर १०० किमी चा प्रवास वाढेल. वेळणेश्वरला समुद्राच्या शेजारीच मुक्कामाची सोय होतीये म्हणजे अगदी दार उघडले की पुढे किनारा.

५ तारखेला जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी लवकरच वेळणेश्वर मंदिरात जायचे त्यानंतर हेदवी च्या गणपती मंदिर पहायचे. तिथून पालशेत मार्गे गुहागर गाठायचे आणि फेरी घेऊन दाभोळला पोहचायचे. ह्या सफरीचा शेवट दाभोळमध्ये करून परतीचा प्रवास चालू करू. बहुदा दापोली, पालगड, लाटवनमार्गे महाडला मुंबई-गोवा महामार्गाला पोहचू म्हणजे परत कुठला तरी एक पर्याय निवडून पुण्याला परत येता येईल.

तर असा हा चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम ठरला आहे बहुतेक बुकिंग्स झालेली आहेत. गाड्यांची कामे, नवीन टायर्स बदलून झाली आहेत. काही छोट्या खरेदी राहिलेत पण पुढच्या दोन तीन दिवसात ते पण होऊन जाईल. एका स्वप्नातीत सफरीची तयारी पूर्ण झाली आहे आता १ तारखेची आतुरतेने वाट पाहणे सुरु आहे.

लवकरच परत भेटूच पूर्ण सफरीचे प्रवास वर्णन लिहायचे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये :-) .
आम्ही वापरलेले संदर्भ -
१. www.konkanyatra.com
२. www.raanvata.com/kokan
३. महाराष्ट्राचा अटलास
४. एक अजीब नकाशा (हा नकाशा तुमच्या कडे असेल तर तुम्ही कधीच चुकणार नाही ह्याची ग्यारंटी आहे. थोडा जुना झाला आहे म्हणजे जे नवीन रस्ते तयार केले गेलेत, नवीन पूल बांधले गेलेत ते ह्या मध्ये नाही मिळणार पण एक उत्कृष्ट गाईड म्हणून तुम्ही जरूर वापरू शकता)
५. माहितीचा खजाना म्हणजेच गुगल (सध्या एक नवीन म्हण प्रसिद्ध होतीये ती म्हणजे "पहिला गुगल करा आणि मग विचार करा" )
६. मित्र परिवार