शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

मला पण टॅगले

परवापासून बघतोय हे टॅगा-टॅगी चे काही तरी प्रकरण चालू आहे. फारसे समजले नाही म्हणजे तसे मुळापर्यंत जायचा पर्यंत पण केला नाही. असो तर पंकज ने मला टॅगले म्हणून म्हंटले लिहून टाकावे एकदा

1.Where is your cell phone?
बाजूलाच ठेवलाय. वाजतो अधून मधून. सायलेंटवर आहे घरी आलोय न सगळे जोपलेत.

2.Your hair?
काळेच आहेत. बारीकच ठेवतो आणि मिलिटरीकट असतो. थोडे कुरळे आहेत आणि सध्या गळत आहेत म्हणून औषधोपचार पण चालू आहे.

3.Your mother?
मी घरी येतोय असे नुसते समजले की मटन तयार. थोडी हळवी आहे प्रत्येक वेळी घरून निघताना डोळ्यात पाणी येते. म्हणून न चुकता दर दुसऱ्या आठवड्याला मी घरी पळतो.

4.Your father?
एक आदर्श पिता. त्यांचे सगळे गुण माझ्यात आलेत. आणि हो मला कधीही नाही म्हणत नाहीत बाकीच्यांचा विरोध असला तरी.

5.Your favorite food?
तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चिकन, मम्मीच्या हाताचे मटन.

6.Your dream last night?
एकदा जोपलो की काही समजत नाही मग स्वप्न कशी पडणार. पडली तरी लक्शात राहत नाहीत.

7.Your favorite drink?
कसल्याच प्रकारचे अल्कोहोलिक ड्रिंक मी घेत नाही..कोक आवडते पण फेवरेट नाही

8.Your dream/goal?
माझे जेवढे छंद आहेत त्या सगळ्यात प्राविण्य मिळवायचे.

9.What room are you in?
घरचा हॉल कम बेडरूम मध्ये

10.Your hobby?
ट्रेकिंग, फोटोग्राफी, बायकिंग, खूप भटकणे आणि हो आताच लागलेले ब्लोग्गिंग चे वेड

11.Your fear?
माहित नाही

12.Where do you want to be in 6 years?
पुण्यातच की आणखी कुठे जाणार

13.Where were you last night?
रात्री १०.३० पर्यंत पुणे-तासगाव बस मध्ये नंतर घरीच गावी आलोय ना

14.Something that you aren’t diplomatic?
अवघड प्रश्न आहे किंवा मला समजला नाही

16.Wish list item?
आता सांगून टाकतोच Canon 5D Mark II आणि पांढऱ्या लेन्स. का माहित नाही पण मला हे हवे आहे आणि २०१० मध्ये मी नक्की घेणार

17.Where did you grow up?
पलूस. बालवाडी ते बारावी मी पलूस मधेच वाढलो. इंजिनिअरिंगची चार वर्षे कोल्हापूरला बावड्यात होतो.

18.Last interesting thing you did?
बाईक वरून कोकण ची सफर... ८०० किमी

19.What are you wearing?
टी शर्ट आणि बर्मुडा

20.Your TV?
घरी आणि पुण्यात दोन्हीकडे ओनिडा के.वाय. थंडरच आहे

21.Your pets?
नाही मला असे प्राण्यांना बांधून ठेवायला नाही आवडत. उगाच हाल बिचाऱ्यांचे

22.Friends
खूप आहेत आणि हो मला प्रत्येकाच्या टच मध्ये राहायला आवडते. शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेक, फोटोग्राफी, ओर्कुट, गावातले आणि इतर असा खूप मोठा मित्र वर्ग आहे

23.Your life?
एकदम निवांत आणि टेन्शन फ्री आहे

24.Your mood?
नेहमी चांगलाच असतो. मूड खराब नाही करून घेत मी किवा मला रागच येत नाही

25.Missing someone?
Actually

26.Vehicle?
हो माझं पाहिलं प्रेम - माझी Pulsar 200. ३२००० किमी ची अखंड साथ दिली आहे मला आणि हो मी लद्दाख ला घेऊन जाणार आहे

27.Something you’re not wearing?
हा कसला प्रश्न.

28.Your favorite store?
वालमार्ट. अजून भारतात नाही उघडले पण हे प्रकरण अशक्य आहे ह्याची भव्यता तुम्ही हे बगीतल्यावरच लक्शात येईल

29.Your favorite color?
लाल. माझी गाडी, हेल्मेट लालच आहेत. मला आकाशी पण आवडतो

29.When was the last time you laughed?
मगाशी पंकजचा पोस्ट वाचताना

30.Last time you cried?
नाही सांगत राव

31.Your best friend?
सगळे बेस्टच आहेत तरीपण जिवाभावाचा एक मित्र आहे प्रसाद नाव आहे त्याचे

32.One place that you go to over and over?
भीमाशंकर आणि हो जोरदार पावसात ते पण शिडी घाटाने

33.One person who emails me regularly?
बरेच आहेत

34.Favorite place to eat?
पुरेपूर कोल्हापूर

झाले एकदा. किती प्रश्न विचारतात लोक आणि स्वताबद्दल लिहायचे म्हंटल्यावर जरा अवघड जाते. असो पण ह्या आठवड्यात मी हे टॅगिंग प्रकरण नक्की काय आहे ते शोधून काढेनच...

मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

पुरेपूर कोल्हापूर

पुरेपूर कोल्हापूर हॉटेलचे जे मेनू कार्ड आहे त्याच्या शेवटच्या पानावर मला हि कविता मिळाली. तिकडेच बसून ऑर्डर ची वाट वाट बगत मोबाईल मध्ये टाईप करून घेतली तीच इकडे देत आहे. कोणी लिहिली माहित नाही पण कवीतेचा एक आणि एक शब्द खरा आहे. वाचून बघा तुम्हाला नक्की आवडेल..

"खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर...
मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर...


रंकाळ्याचा वारा कोल्हापूर...
पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...


खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...
जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...


चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर...


मिसळीचं वाटण कोल्हापूर...
पांढ-या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...


विन्या मिल्या पश्या कोल्हापूर...
पम्या पक्या दिप्या कोल्हापूर...


शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...
राजकारणातील गेम कोल्हापूर...


शाहिरीचा बाज कोल्हापूर...
गळ्यातला साज कोल्हापूर...


मातीमधलं पसरलेलं घोंगडं कोल्हापूर...
नखशिखांत रांगडं कोल्हापूर...


ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...
शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...


क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपूर
ते.... माझं कोल्हापूर... "

बुधवार, १६ डिसेंबर, २००९

घरच्या परसबागेतून भाग १


आजकाल लोकांनी फेसबुक वर मोठ्या प्रमाणावर शेती करायला चालू केली आहे. हो म्हणजे जर तुम्हाला माहित नसेल तर फेसबुक वर फार्मव्हिले नावाचा एक प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी थोडी जागा आणि थोडे भांडवल दिले जाते ते वापरून तुम्ही नांगरणी, पेरणी, पशुपालन वगेरे वगेरे करून शकता, धान्याची विक्री करून पैसे कमवू शकता. तर मी सुद्धा हल्लीच हे सगळे करून पहिले मस्त वेळ जातो पण येवढा वेळ नाहीये राव.

फार्मव्हिले वरून आठवले माझ्या घरच्या रिकाम्या जागेत माझ्या मम्मी पप्पानी अशीच हौस म्हणून वेगवेगळी झाडे लावली आहेत. काही बिया पडून उगवली तर काही लावली आहेत. म्हंटले ह्या निमित्ताने आज लिहावेच जरा. तसे नेहमी घरी गेलो की मी एक तासभर घरच्या परसबागेत घालवतोच, पण कॅमेरा घेऊन. तिकडे येणार वेगवेगळे पक्षी टिपतो. आमच्या परसबागेत अगदी मोठ्या वृक्षांपासून छोटे छोटे सिझनल वेल पण आहेत. मी काही फोटो काढलेत ते इकडे देतोय.

सुरवात आंब्यांपासून करतो. असेच एक पडके झाड उगवून आले आणि बघता बघता मोठे हि झाले. दर वर्षी एक शंभरबर आंबे निघतात. फोटो पाहून आकाराची कल्पना आली असेलच, तरी हे कच्चे आहेत..

सीताफळ - घराच्या भोवती एक ५ ते ६ झाडे आहेत. सिझन मध्ये सगळी झाडे लग्गडलेली असतात. माझी मम्मी लोकांना देऊन देऊन कंटाळते. पक्ष्यांची तर मेजवानीच असते खासकरून बुलबुल पक्षी अर्धे खाऊन फळ झाडाला सोडण्यात पटाईत आहे.

चिक्कू - एकच झाड आहे पण खूप लागतात आणि त्याची गोडी काही वेगळीच आहे

जांभूळ - सिझनल, मला झाडावर चढून खायला आवडतात. आमच्या शेजारचे पाटील सर (म्हणजे ते ११-१२ विला मला गणित शिकवायचे) ते सुद्धा झाडावर चढून जांभळे काढतात. बरीच खराब होऊन खाली पडून जातात कारण काही ठिकाणी तुम्ही पोहचू शकत नाही झाड लवचिक असते आणि पडायचा धोका असतो.


बदाम - अलीकडेच बदमे लागायला सुरुवात झाली आहे. पण बदमापेक्षा त्याच्या सावलीचा खूप उपयोग होतो आणि असे पण एवढ्या उंच झाडावरून बदमे काढायचे कष्ट कोणी करत नाही. एकतर काठीने पाडा नाहीतर मग दगड आहेतच :-)

लिंबू - विकत आणावे लागत नाहीत इतके तरी निघतातच

दोडका - असाच एक पडीक वेल भाव खाऊन गेला. चार पाच वेळा नक्कीच झाली असेल भाजी. मला आवडत नाही सो जास्ती लिहित नाहीये

कडू कारले - अगदीच कहर केला ह्या सिझनला, शेजारी पण कंटाळले असतील, मम्मीने तर तिच्या सगळ्या स्टाफ ला वाटले असतील. पण परत मी खात नाही सो जाऊदे. अजूनही आहेत पाहिजे असतील तर सांगा घेऊन येईन पुढच्यावेळी गेलो की.


टोम्याटो - कुठे तरी एखादे झाड उगवले होते. दिसला म्हणून फोटो काढला.

कोरफड - मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे

बाकी मग नारळाचे एक झाड आहे ज्याला जास्त नाही पण मोजके नारळ लागतात. तसेच चिंचा, हो चिंचेचे झाड आहे झाड कसले वृक्षच आहे तो अगदी घराच्या भिंतीपासून तीन फुट अंतरावर आहे बरेच लोक म्हणतात घराला बाधा होईल मुळ्या भिंतीमध्ये शिरतील वगेरे पण आम्ही  ते कापले नाही. खूप चिंचा लागतात. मम्मी छान मीठ लावून गोळे बनवून ठेवते. राहिलेल्या जो मनुष्य काढायला येतो त्याला आम्ही देऊन टाकतो. फळांबरोबर फुलांची पण खूप झाडे आहेत. झेंडू, निशिगंध, गुलाब, मोगरा, जास्वंदी, अबोली आणि मे फ्लावर सुद्धा.


तर आवडली का माझ्या मम्मी पप्पानी जपलेली परसबाग. मग कधी येताय बघायला. पुढच्या भागात परसबागेतल्या पक्ष्यांबद्दल लिहीन.

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

व्होट फॉर मी

HP ने आयोजित केलेल्या HP Climate Change Photography Contest ‘०९  म्हणजे वातावरणातील बदलावरील छायाचित्र स्पर्धेत मी भाग घेतला आहे. मला तुमच्या अमूल्य मताची गरज आहे. जर माझे छायाचित्र तुम्हाला योग्य आणि विषयाला अनुसरून वाटले तर जरूर मत द्या. मत देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..(एका कॉम्पुटर वरून एकदाच मत देता येईल).

मत देण्यासाठी इथे क्लिक करा तुम्हाला तुमचा निर्णय देणे सोपे जावे ह्यासाठी ते छायाचित्र इथे देत आहे.

ह्या छायाचित्राद्वारे मला असे सांगायचे आहे कि
"पृथ्वी नष्ट होते आहे आणि मी, तुम्ही आपण सगळे जबाबदार आहोत. ह्यातून बाहेर पडायचे असेल तर झाडे लावा आणि ती जगवा" .

धन्यवाद.

मंगळवार, ८ डिसेंबर, २००९

पहिला स्नो फॉल- (६ डिसेंबर, ०८)

त्या दिवशी शनिवार होता तसे आदल्या दिवशीच कळले होते कि सकाळी हलकासा बर्फ पडणार आहे ते. पहाटे जाग आली त्यावेळी नेहमी पेक्शा जरा जास्तच उजेड दिसत होता त्यात घराबाहेर असणारे झाड पांढरे दिसत होते..म्हंटले झोपेत असल्यामुळे असे होतेय का?..आळस झटकून जवळच्या खिडकीतून बाहेर डोकावले तर आश्चर्याचा धक्का बसला..सगळीकडे बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली होती. म्हणजे पहिल्यांदाच असे काही पाहत होतो त्यामुळे ढगात असल्यासारखे वाटले. कॅमेरा जवळच होता खिडकीतूनच एक फोटो काढला.बाल्कनीतून हात बाहेर काढला आणि थोड्याच वेळात बर्फाच्या खिसाने हात भरला मस्त फिलिंग होते...कपडे बदलून (आता फोटो काढायचे म्हंटल्यावर चांगले कपडे नको का :-) ). तिघे पण आवरून बाहेर पडलो सकाळी सातच्या दरम्यान बर्फामध्ये पहिले पाऊल टाकले. (त्याचा व्हीडीओ काढून ठेवला आहे). जास्ती थंडी न्हवती बर्फाचे छोटे छोटे कण पडत होते. खूप सारे फोटो काढले एकदा पाय घसरून पडलो ही, विशेष असे लागले नाही. एक तास बाहेर फिरलो मग जरा हुडहुडी भरल्यावरच घरी आलो..मजा आली. काही फोटोस देतोय इथे तुम्हाला आवडतीलआवडला असेल तर जरूर कळवा...

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

शूरा मी वंदितो - २६/११भावपूर्ण श्रद्धांजली त्या शूर वीरांना ज्यांनी दहशतवादाविरुद्ध लढा देताना आपले प्राण अर्पिले मुंबईला वाचविण्यासाठी, आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी, आपल्या देशासाठी...

कॉन्स्टेबल : जयवंत पाटील
कॉन्स्टेबल : योगेश पाटील
कॉन्स्टेबल : अंबादास पवार
रेल्वे पोलीस: एम. सी. चौधरी
एनएसजी कमांडो: गजेंदर सिंग
इन्स्पेक्टर: शशांक शिंदे
सब इन्स्पेक्टर: प्रकाश मोरे
कॉन्स्टेबल : ए. आर. चित्ते
कॉन्स्टेबल : विजय खांडेकर
असिस्ट. सब इन्स्पेक्टर: व्ही. ओबाळे
सब इन्स्पेक्टर: बाबुसाहेब दुर्गुडे
सब इन्स्पेक्टर: नानासाहेब भोसले
मेजर: संदीप उन्नीकृष्णन
Add. कमिशनर पोलीस : अशोक कामते
सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर: विजय साळसकर
ए टी एस प्रमुख: हेमंत करकरे

देशाच्या सर्व शूर सैनिकांना मी वंदन करतो जे अजूनही दहशतवादासाठी लढा देतायेत अगदी स्वतःच्या जीवाची, परिवाराचीही चिंता न करता फक्त आपल्यासाठी, आपल्या देशासाठी...

 
(हा फोटो माझा नाहीये इंटरनेट वरून घेतला आहे  )

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २००९

ताम्हिणी सिक्रेट लेक

P@P च्या काही लोकांनी मुळशी ताम्हिणी च्या पठारांमध्ये लपलेला एक तलाव शोधून काढला आहे. काही लोकांनी अगदी दोन तीन तीन ट्रिप्स मारल्या. त्यांचे फोटो बघून राहवत न्हवते जायची खूप इच्छा होती पण एकटे जाणे म्हणजे तसे रीस्किच. शनिवारी कवडी झाले त्यामुळे रविवारचा काही प्लान न्हवता पण ध्रुव ला सांगून ठेवले होते जर लवळेला जाणार असशील तर मेसेज कर म्हणून.

शनिवारी रात्री उशिरा पंकजचा मेसेज आला "ताम्हिणी सिक्रेट लेक?" उत्तर त्याला पण माहित असावे लगेच होकार कळवून टाकला. मग पुढचा मेसेज आला "पहाटे ४.०० ला चैतन्य च्या घरी भेट, येताना सुहास ला पिक कर". मग फोनाफोनी झाली सुहासकडून पत्ता घेतला आणि झोपून गेलो. बरोबर ३.२७ ला अलार्म च्या ३ मिनिट अगोदरच जाग आली. आवरून सुहासकडे पोहोचलो पत्ता माहित न्हवता पण गुगल नकाशाचे आभार, पद्मावती-डहाणूकर मार्ग बिनचूक दाखवला. १० मिनटात सुहासकडे हजर. थंडी इतकी होती कि दोन जर्किन घालून पण जाणवत होती. सुहासचे हाल झाले बिचारा कानालापण बांदले नाही. बरोबर चार ला चैतन्य च्या घरी पोहोचलो पंकज आणि तो तयारच होते मी गाडी पार्क केली आणि कारमध्ये घुसलो. गर्मीत बरे वाटले. आम्ही मुळशीच्या दिशेने निघालो. चैतन्य मधून मधून ए.सी चालू करायचा मग मी आणि सुहास मागून ओरडायचो. पण काय करणार काचेवर दव जमायचे त्यामुळे तसे करणे भागच होते.

ह्यामध्ये मी एकटाच फर्स्ट टायमर होतो बाकीचे तिघे पण अगोदर जाऊन आले होते. त्यांच्या मध्ये आज आम्ही खूपच लौकर निघालो होतो. चैतन्य ने पुठ्याची बिस्किटे घेतली होती (मारी गोल्ड) भूक लागेल तशी खात होतो. सुहासने झोपायचा बराच पर्यंत केला पण तो मागच्या सीटवर फिट होत न्हवता त्यात रस्ता इतका खराब होता की खड्डा कुठे आणि रस्ता कुठे समजतच न्हवते.

५.३० च्या दरम्यान आम्ही मुख्य रस्ता सोडला आणि एका उजवीकडे वळलो तो रस्ता एका अरुंद पुलावरून पुढे लोणावळ्याला जातो. रस्त्यात एक योगा आश्रम पण लागतो. दोन तीन की.मी आत आले की डाव्या बाजूलाच आहे सिक्रेट लेक. मस्त हवा सुटली होती. आम्हाला थोडा वेळ वाट पहावी लागणार होती कारण अजून सूर्योदय झाला न्हवता. सकाळच्या वेळी तळ्यावर बगळ्यांची हालचाल सुरु झाली होती. तलावाचे पाणी अगदी काचेसारखे स्वच्छ आणि शांत होते. जसा जसा सूर्य वर येऊ लागला तसे तसे आकाशात विविध रंग उभारू लागले. समोरच असलेल्या डोंगरावर सूर्याची किरणे पडली आणि त्याचे मस्त प्रतिबिंब पाण्यात दिसू लागले ह्याच साठी तर आलो होतो. एक एक क्षण कॅमेऱ्यात टिपून घेऊ लागले सगळे. चैतन्य ने लवकरच तो नाद सोडला आणि त्याची ३०० एम एम लावून पक्ष्यांच्या मागे गेला तो. पंकज आणि सुहास त्यांच्या १०-२० म्हणजे वाईड अंगल लेन्सेस लावून फोटो काढत होते मी मात्र माझी कीट लेन्स १८-२०० जी कधी बदलायची गरजच पडत नाही ती वापरून चालू होते माझे.


तिकडे दोन तास घालवल्यावर आम्ही परतीला लागलो. १०० मीटरच आलो असेन की एका शेतात एक बाबा काम करत असलेले दिसले सगळे एकदम म्हणाले छान पोट्रेट आहे. एकटाच उतरायचे ठरले म्हणून पंकज उतरला पण आम्हाला पण राहवले नाही.
 चैतन्य ला किंगफिशर दिसला, एक नाही चार होते मग तो कशाचा गाडीत बसतोय. सुहास ने गप्पा मारत मारत खूप फोटो घेतले बाबांचे. पंकज आणि चैतन्य किंगफिशर च्या मागे लागले होते. मनासारखे फोटो मिळाल्यावर आम्ही पोटाची आग थांबवण्यासाठी मुळशी कडे निघालो. एका ठिकाणी थांबून मस्त मिसळ पाव आणि चहाची मेजवानी झाली. मग गप्पा मारत मारत कधी पुणे आले कळलेच नाही. ४ ते १२ हे आठ तास कसे गेले कळलेच नाही...


बघा तुम्ही पण एकदा प्रयन्त करून लवकर उठा आणि मस्त भटकंतीला बाहेर पडा..निसर्ग तुम्हाला साद घालतोय...


सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

कावडी पक्षी शूट

दृष्टीकोन संपले आता काय? भटकंती कधी चालू करायची असा प्रश्न पंकजला दहावेळा विचारून झाला. शुक्रवारी तसा घरी जायचा प्लान होता पण काही कारणांमुळे तो पुढच्या वीकेंड ला गेला. आयताच मौका मिळाला परत एक मेसेज टाकला पण अजूनही काही प्लान बनला न्हवता. त्यातच विकासचा रात्री फोन आला पानशेत ला येणार का होय म्हणून टाकले. त्याच रात्री मस्त चिकन बनवले त्यामुळे जरा झोपायला उशीर झाला. पंकजचा मेसेज आला होता "If interested कावडी ला येणार का? " हा प्रश्न का होता ते समजले नाही असो. तर दोन दोन प्लान होते त्यात पोटात चिकन गेले होते.

सकाळी 4.30 ला काय उठायचे जमणार नाही म्हणून पानशेत ऐवजी कावडी ला जायचे ठरवले मग एक दोन मेसेज केले आणि ध्रुवला पिक करून सकाळी ६.१५ ला हडपसरच्या पुलाखाली भेटायचे ठरले. सकाळी उठून ध्रुवला घेतले आणि गाडी हडपसरच्या दिशेने सोडली. थंडी खूप होती. पंकज आणि चैतन्य वेळेत आले आणि आंम्ही कवडीच्या दिशेने निघालो. तसे जास्ती लांब नाही 10 मिनिटे बस होतील हडपसर पासून. रेल्वे फाटक लागले होते त्यामुळे तिकडे थांबावे लागले. ध्रुव म्हणाला इकडे सूर्योदय छान मिळतो मग काय रेल्वे गेल्यावर गाडी फाटकापलीकडे उभी केली पंकज आणि चैतन्य मागे राहिले होते. रेल्वे रुळाचे दोन तीन फोटो घेतले तेवढ्यात ते दोघे आलेच त्यांच्या मागेच स्वातीची गाडी आली. पंकज ने सागितले किरण आणि सुहास पण येतायेत मागून.

म्हंटले आज काही खरे नाही स्वाती किरणची ४०० एम एम आणि चैतन्य आणि धृवची नवीन ३०० एम एम म्हणजे आज भरपूर पक्षी कॅमेऱ्यात कैद होणार असं वाटलं. सूर्योदयाचे फोटो घेऊन आम्ही कावडीच्या दिशेने निघालो. मेन रोड पासून साधारण एक कि.मी असेल. गावात शिरले कि तुम्ही लगेच नदीकाठी पोहचता. हल्लीच झालेल्या अति वृष्टीमुळे खूप सारी घाण तेथे असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर अडकून बसली होती. पण घाण असलेल्या जागीच पक्ष्यांना मेजवानी बरेच पक्षी तिकडे पाहायला मिळाले. सकाळचा नजरा मस्त होता उगवत्या सूर्याची किरणे पाण्यावर पडली होती, पाण्यातून वाफा निघत होत्या, त्यातच एखादा पक्षी झेप मारून पाण्यातून त्याचे खाद्य उचलून जायचा. माझ्याकडे २०० एम एम असल्यामुळे तसा पक्ष्यांचे फोटो काढायचा येवढा स्कोप न्हवता पण एक दोन तीन मिळाले. पंकज आणि सुहास ची पण अशीच काही अवस्था होती त्यामुळे आम्ही बंधाऱ्यावर बसून गप्पा मारणे पसंद केले.


सकाळचे कोवळे उन, व्हिटामिन डी वगेरे वेगळे सांगायची गरज नाहीये ना. माझा वाकी सुहासला जाम आवडला आम्ही त्याबरोबर खेळलो. एक तासाभरात ह्या लोकांचे समाधान झाले असावे चांगले काही फोटो मिळाल्याचा आनंद दिसत होता. साधारण १० च्या सुमारास डी सी मध्ये नाश्ता करायचे ठरवून आम्ही तिथून निघालो.

ठिकाण- कवडी (हडपसर पासून जवळ. टोल नाक्याच्या पुढे १०० मी वर कवडीची फाटी दिसते डावीकडे)
वेळ - शक्यतो सकाळी लवकर किंव्हा सायंकाळी पक्षी बाहेर पडतात

माझ्या काही क्लिक्स..
बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

दृष्टीकोन दुसरा तिसरा दिवस

दिवस २ रा :
पहिला दिवस खूपच हेक्टिक होता त्यात रात्री जागून ब्लॉग लिहिला होता..सकाळी लवकर उठून परत तिकडे पोहोचलो. आज शनिवार असल्यामुळे गर्दी अपेक्षित होती.

सकाळी दहा नंतर लोक यायला सुरुवात झाली. आज फोटोग्राफर्ससाठी मेजवानी होती म्हणजे ऋषीचे लाईटरूम चे आणि सुहास चे फोटोशॉपचे सेशन्स होते. ११.३० ला सेशन चालू झाला खूपच छान झाला आज नवीन काहीतरी शिकायला मिळाले. सुहासने पण मास्किंग बद्दल खूप छान सांगितले.

दुपारी (दुपार कसली चार वाजले होते) चैतन्य ला जाऊन पराठे खाल्ले. (तिकडे आजकाल कांदे महागल्यामुळे कोबी देतात पराठ्याबरोबर - सौमित्र). तिकडून आलो तर विशालचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवरचे सेशन चालूच झाले होते. विशाल त्याने काढलेले फोटो दाखवत होता आणि त्याच्या बद्दल ची माहिती सांगत होता. काही टिप्स पण दिल्या त्याने. प्रदर्शन फळाला लागल्यासारखे वाटत होते. खूप काही शिकायला मिळत होते, वेगवेगळे कॅमेरे, लेन्सेस वापरायला मिळाल्या. भूषणचा निकॉन 700D पूर्ण वेळ माझ्याकडेच होता.

दिवस कसा संपला कळलेच नाही. आता ओढ लागली होती ती भूषणची गाणी आणि गिटार ऐकण्याची. आज अगदी व्हीडीओ कॅमेरा सेट करून ठेवण्यात आला सुहासने पण त्याच्या 5D मधून व्हीडीओ घेतले. आजपण भूषणने गिटार ट्यून करून खूप छान गाणी गाईली. मजा आली. आज मुंबईवरून ऋषी आणि मंगेश आले होते मग रात्री मी, पंकज, सचिन, ऋषी, मंगेश आणी चैतन्य हॉटेल चैतन्य मध्ये चिकन खाल्ले. पंकजने वेगळे काहीतरी करायचे म्हणून चिकन पराठा मागवला पण प्रयन्त फसला निम्मा टाकून दिला.

दिवस ३ रा :
रविवार आज जरा उशिराच उठलो आणि दहा वाजेपर्यंत तिकडे पोहोचलो. सौमित्र ज्याच्याकडे चावी असायची, चैतन्य, ऋषी आणि मंगेश चौघेच आले होते. बाहेर खूप कॉलेज ची मुले दिसत होती काल एकले होते कि काहीतरी डान्स चा कार्यक्रम आहे पण नंतर समजले कि चेन मार्केटिंग चे बळी आहेत हि सगळी पोरे आणि काही सुटा बुटात असलेली पोरेच ह्यांना बकरा बनवत होती शेवटी मास्टर माइंड कुणीतरी दुसराच असणार पण जाऊदे गर्दी होती हे खरे. भूषण म्हणाला अगदी पोट्रेट्स आहेत सगळे. आज मंगेशच सेशन होते जे माझे राहून गेले काहीतरी मोठे मिस केले आहे मी. दुपारी सुनील कापडीयांचे प्रिंटींग विषयी सेशन झाले. ते चालू असतानाच पोटातली भूक भागवण्यासाठी पिज्झा ऑर्डर केले कधी न्हवे ते वेळेवर आलो तो. पोटात काहीतरी गेल्यावर पोट शांत झाले.

भर नोव्हेंबर मध्ये पाउस पडत होता पण तरी पण लोक येतच होते. रात्री आठच्या दरम्यान कुंड्या आणि झाडे घेऊन जाण्यासाठी अजिंक्यचा टेम्पोवाला हजर झाला. जितक्या वेळेत आम्ही कुंड्या वर आणल्या होत्या त्याच्या कितीतरी कमी वेळात त्या टेम्पोत भरल्या गेल्या. फक्त झाडे (झाडे कसले वृष होते ते) टेम्पोत चढवताना हाल झाले. (सुदैवाने मी तिकडे न्हवतो म्हणजे रिकामा बसलो न्हवतो फ्रेमजवळ माहितीचे कागद चिकटवत होतो). अजून एक तासभर बाकी होता पण आताच कसे सुने सुने वाटत होते. वेळ होती ग्रुप फोटोची लगेच कॅमेरे सज्ज झाले आणि गुप फोटो सेशन झाले.

नऊच्या दरम्यान आम्ही फ्रेम्स काढायला चालू केल्या. मी तितक्यात चटका करून सगळ्यांच्या कॅमेर्यातले फोटोस माज्या लापटोप वर टाकले (हावरटसारखे - पंकज). झाले सगळे रिकामे झाले.कोणीतरी जाऊन गिटार आणली हो हा कार्यक्रम चुकवून कसे चालेल पण त्या आधी मंगेश ला सगळ्यांनी निरोप दिला बिचारा एक पैसा घेतला नाही एवढे छान डिझाईन करून दिले होते त्याने. परत आज भूषणची गिटारवरची पाच गाणी झाली. उद्या हे सगळे नसणार याचे दुख सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते पण प्रदर्शन यशस्वी झाल्याचा आनंदही तितकाच होता. त्याच आनंदाचे सेलिब्रेशन साठी गुडलक घाठले. मस्त चिकन वर तव मारला आणि १२ वाजता सगळ्यांचा निरोप घेतला.


शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

दृष्टीकोन २००९ - दिवस पहिला

(आज खूप कंटाळा आला आहे पण थोडासा लिहायचा पर्यंत करतोय डिटेल मध्ये पंकज टाकेलच) काल रात्रीची धावपळ अगदी फोटोगॅलरी साफ करण्यापासून ते लाईटस्, फ्रेम्स अगदी रात्री दोन वाजल्यापर्यंत चालू होती. तसे जेवण पण जाले न्हवते सचिनने आणलेले मालपाणी चे क्रीमरोल्स आणि ध्रुव ने आणलेले वडापाव एवढच पोटात होत. थोडी राहिलेली कामे सकाळी करायची ठरवून थोड्या तासांच्या निद्रेसाठी सगळे पसार झालो.

              सकाळी लवकर आवरून ठरल्याप्रमणे ९ वाजता गॅलरीला पोहोचलो. तिकडे सौमित्र आणि स्वाती राहिलेल्या फ्रेम्स लावत होते तर पंकज आणि चैतन्य राहिलेले चार फोटो फ्रेम करायला गेले. मी जाऊन राहिलेल्या लाईटस लावल्या आणि नंतर सगळ्या व्यवस्थित अडजस्त करून घेतल्या. तोपर्यंत भूषण कार्पेट वाल्यांना कार्पेट सहित घेऊन आला. वाह रेड कार्पेट टाकल्यावर काय मस्त फील आला छान वाटले. सकाळी लवकर येऊन सुहास ने बाहेरच मोठे पोस्टर लाऊन घेतले होते. फायनली ४ फ्रेम्स सोडल्यातर आणची तयारी पूर्ण झाली.११.०० ची वेळ दिली होती पाहुन्य्नाना, मग भूषण त्यांना आणायला गेला. सौमित्रने उगाच माझे नामकरण करून टाकले 'हर्क्युलिस' म्हणे काही केले नाही मी फक्त दोन चार खिळे जे निघत न्हवते आणि एक दोन विचित्र फ्रेम सरळ लावल्या तर सगळे लगेच हर्क्युलिस म्हणायला लागले :-)


१०.३० च्या दरम्यान विद्या महामंडळ मुकबधीर संस्थेची मुलं व त्यांचे शिक्षक आले. थोडेफार प्रेक्षक यायला सुरुवात झाली होती. बरोबर ११.०० ला भूषण प्रमुख पाहुणे श्री पारकनिस यांना घेऊन हजार झाला. डी.एन.ए चे मुख्य छायाचित्रकर श्री. अनिल अवचट ही वेळेत वेळ काढून हजार झाले. तसेच प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक युनायटेड पेरीफेरल्स श्री सुनील आपल्या दोन सहकार्यानं समवेत आले.


उदघाटनाचा कार्यक्रम वेळेत चालू झाला. आरती ने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री पारकनिस हे नावाजलेले छायाचित्रकार आहेत त्यांची भरपूर प्रदर्शने झाली आहेत, त्याच बरोबर त्यांची दरवर्षी सवाई महोस्तवातल्या फोटोंची दिनदर्शिका बनते. पु. ला. चे ते खूप चांगले मित्र होते भारतीय डाकविभागाने प्रसिद्ध केलेल्या पु. ला. देशपांडे चे डाक तिकिटावर त्यांनी काढलेला फोटो आहे. आरती ने इतर पाहुण्च्याचा परिचय करून देत आलेल्या मुकबधीर विद्यार्थ्यानांचे स्वागत केले.पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पारकनिस काकांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. देशपांडे बाईनी त्यांच्या मुलांना समजावे म्हणून त्यांच्या भाषेत लगेच भाषांतर केले. विशेष म्हणजे आपल्या मुलाचे कौतुक करावयाला आलेल्या अबोधच्या बाबांनी बसल्या बसल्या एक कविता आणि दोन चारोळ्या लिहिल्या आणि त्या खास आमच्यासाठी वाचून

दाखवल्या. (आता त्या माझ्याकडे उपलब्ध नाहीयेत मी नंतर टाकेन). सौमित्र च्या आईनेही आमचे कौतुक केले. अशा तरीने आमच्या तिसऱ्या प्रदर्शनाला सुरुवात झाली.


या कार्यक्रमानंतर आमचे एक महत्वाचे काम राहून गेले होते ते चालू झाले ते म्हणजे छायाचित्रांची माहिती तसेच आमचे आणखी एक प्रायोजक फ्लॉप म्यगझिन यांनी एक स्पर्धा ठेवली ज्यात येणार रसिक त्यांच्या आवधीचे पाच फोटो निवडून देणार आणि मग त्यानंतर हे फ्लॉप म्यगझिन वाले त्यातले दोन निवडून ते फोटो विकत घेणार त्यासाठी फोटोना क्रमांक देणे आवश्यक होते. मग ते काम चालू झाले. त्यात खूप वेळ गेला पण काम सुंदर झाले. लोक येत होतेच.


दुपारी रेडीओ सिटी वरती आर जे ने दिल चाहता च्या गाण्यानंतर केलेली छान जाहीरात ऐकून सगळ्यांना अगदी सार्थक वाटले. ह्या वर्षी लोकांपर्यंत पोहोचण्यात कोणतीच कसर ठेवली नाहीये. दुपारीच आय. पी. एन. नावाच्या एका टी.व्ही. रिपोर्टर येऊन बातमी व रेकॉर्डिंग घेऊन गेल्या. हजर असलेल्या मेम्बर्स नी उस्फुर्तपने माहिती व प्रतिकिया दिल्या.

तीनच्या दरम्यान सगळ्यांना जाम भूक लागली होती सकाळपासून एक सामोसा आणि चहा वर होते सगळे. मग काय अमित ने पिज्झा मागवले जे पाच मिनटात येतो म्हणत १ तासांनी आले तोपर्यंत पोटात कावळ्यांचे रान उठले होते. लोक पिज्झा वर तुटून पडले. तसे घासपूस वाले दोनच होते पण उगाच पाप नको म्हणून बाकीच्यांनी एक एक घास तरी खाल्लाच त्यातला.


संध्याकाळी बर्यापैकी गर्दी झाली. लोक छायाचीतरांचा आनंद लुटण्यात मग्न होते. काहींनी फोटो विकत घेण्याबद्दल बोलून दाखवले तश्या नोंदीही करून घेतल्या. लोक अभिप्राय देऊन जात होते.

रात्री नऊ नंतर भूषणला आग्रह करून गिटार चा डेमो द्यायला सांगितला होता. त्याने खास घरी जाऊन गिटार आणली. मग काय सगळे बंद करून दिवसाचा शेवट केला आणि बाहेरच्या व्हरांड्यात पाय्रीवर्ती भूषण आणि त्याच्या गिटार जवळ घोळका करून बसलो. भूषणने सगळे सेट करून पहिल्या गाण्याला सुरुवात केली इंग्रजीमधले अनिस हे गाणे खूप छान रित्या गिटार वाजवत सदर केले. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर त्याने ये शाम मस्तानी आणि भवरे कि गुनगुन सादर केले काय सुंदर गिटार वाजवली सगळे स्तब्ध झाले होते. त्यानंतर फर्माईश म्हणून लकी आलींचे ओ सनम आणि स्वतःच्या आवडीचे डूबा डूबा राहता हू सादर केले.. गारवा आणि एका इंग्रजी गाण्यानंतर उद्या परत गिटारचा कार्यक्रम नक्की करून आम्ही तिथून बाहेर पडलो. पंकज आणि मी गंधर्वला जेवलो आणि घराची वाट पकडली.

 प्रदर्शनाचे काही फोटो इकडे देतोय पण विनंती आहे कि नक्की भेट द्या..


१. काही विदेशी नागरिकांनीही भेट दिली


 
 २. मुकबधीर संस्थेचे विद्यार्थी प्रदर्शन पाहताना

 
 ३. छायाचित्रे

 
४. प्रदर्शन पाहण्यात गुंग असलेला रसिक वर्ग 

 
 

५. छोटा प्रेक्षक६. एक निवांत क्षणी मेम्बर्स
आवडले न हे सगळे मग जरूर भेट द्या..